मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाचा नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात NCB अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. दरम्यान, आज सकाळी रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCB ने धाड टाकली असून ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्या सोबत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया आणि तिच्या भावालाही तत्काळ अटक केली जाऊ शकते.
यापूर्वी एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.