बेंगळुरू: पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानंतर मंत्रालये आणि सर्व विभागांमध्ये अंतर्गत परिपत्रक काढून रिक्त पदांची संख्या आणि त्यासंबंधीची माहिती मागवण्यात आली आहे. नव्याने रोजगार निर्मिती आणि रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यानं पंतप्रधान कार्यालयानं हे पाऊल उचललं आहे.
दरम्यान लवकरच यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाद्वारे एक महत्वाची बैठक बोलावण्यात येईल आणि विविध विभागांमधील रिक्त पदांबाबत चर्चा करण्यात येईल, असं अर्थ मंत्रालयाला सूचित करण्यात आलं आहे. ३० एप्रिल २०१९ पर्यंत रिक्त असलेल्या पदांबाबत माहिती मागवण्यात आली आहे. ‘पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यग्र आहेत. अशी कोणती माहिती गोळा करण्यात येत आहे याबद्दल मला कल्पना नाही. माझ्याकडे जबाबदारी असलेल्या मंत्रालयात सहा हजार कर्मचारी आहेत आणि असं कोणतंही पत्रक काढण्यात आलेलं नाही,’ असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं.