नवी दिल्ली :- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात देशाची राजधानी दिल्लीत चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या घडामोडीला महत्व आहे.
राहुल यांच्याशी तपशीलवार चर्चा झाल्याची माहिती सुप्रिया यांनी ट्विटरवरून दिली. मात्र, त्या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही. मागील विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत आघाडी केली. ती आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचा निर्णय त्या पक्षांनी घेतला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्याने राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला. कॉंग्रेस कार्यकारिणीने तो फेटाळला असला तरी राहुल राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. पक्षाच्या कामकाजापासूनही ते दूरच राहत आहेत. मात्र, महाराष्ट्रासह विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांमधील कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकांमध्ये ते सहभागी होणार आहेत. अशातच त्यांनी सुप्रिया यांच्याशी चर्चा केल्याची बाब कॉंग्रेसच्या दृष्टीने सकारात्मक घडामोड मानली जात आहे.