अमळनेर (प्रतिनिधी) – संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा वाढत्या उद्रेकामुळे अनेक गोष्टींवर दुष्परिणाम झाला आहे. तसाच परिणाम रक्तदानावरही झाला आहे. लॉकडाऊनमुळे मोठी रक्तदान शिबिरे घेण्यात अडचणी येत आहेत. पण अश्या स्थितीत सध्याची गरज म्हणून आयोजित करण्यात आलेले हे शिबीर उपयुक्त व कौतुकास्पद ठरणारे आहे असे प्रतिपादन अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रा.स्व. संघाचे तालुका संघचालक डॉ.चंद्रकांत पाटील,लो.टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल,चिटणीस प्रा.डॉ.प्र.ज.जोशी,तालुका कार्यवाह हितेश शहा हे व्यासपीठावर उपस्थित होते.
रुग्णालयांमध्ये रोज होणारी ऑपरेशन्स आणि गंभीर आजाराचे रूग्णांना लागणारे रक्त या शिबीराच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते या दृष्टीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

यावेळी पुढे बोलतांना पो.नि. अंबादास मोरे पुढे म्हणाले की, कोरोनामुक्त झालेल्या सुदृढ रूग्णांनी आपला प्लाझ्मा दान करावा यासाठी त्या सुदृढ रूग्णांना प्रेरीत करण्याचे काम आपण करावे असे आवाहन त्यांनी केले. श्री मोरे यांनीही स्वतः रक्तदान केले. उद्घाटन प्रसंगी रक्तदान शिबीर नियोजनासाठी आलेल्या जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे मधुकर सैंदाणे,अर्जुन राठोड चंद्रकांत जोशी किरण तोडकर यांचे स्वागत करण्यात आले. शिबीराच्या आयोजनासाठी एच.डी.एफ.सी. बँकेचेही सहकार्य लाभले.यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे उप कार्याध्यक्ष निरज अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,विवेकानंद भांडारकर,लोटन पाटील,जे.डी. निकुंभ,पोलीस नाईक डॉ.शरद पाटील,अशोकराव पाटील, विकासराव जोशी, राजेंद्र निकुंभ, प्रकाश ताडे,एच.डी.एफ.सी. बॅंकेचे कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले.
या शिबीरात ५१ व्यक्तींनी रक्तदान केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी रा.स्व.संघाचे राजेंद्र पाटील, अमित जोशी, पंडीत नाईक, देवेंद्र परदेशी, महेंद्र परदेशी, विजय पाटील,सं वैद्य, कमलेश कुलकर्णी,नि जोशी, एम.डी.चौधरी,प्रसाद मांडे,तन्मय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

