मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते. यातूनच लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली. पण आपण नक्की शिवसेनेत की भाजपमध्ये प्रवेश करणार, हे क्षीरसागर यांनी स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला होता. आता अखेर ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जयदत्त क्षिरसागर यांचा शिवसेना प्रवेश हा बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच क्षीरसागर हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
जयदत्त क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्तांची बैठक बोलावली होती. या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्षनेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात आला होता.