जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करीत असताना जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांवर शहरातील काही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने काढलेले वॉरंट रद्द करण्यासाठी आठ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड मंगळवारी (दि. १४) न्यायालयाने ठोठावला. यात माजी खासदार ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, रज्जाक मलीक, वाल्मीक विक्रम पाटील, मीर नाजीम अली, मंगला भरत पाटील, परेश दिलीप कोल्हे, विशाल गुलाबराव देवकर यावेळी न्यायालयात हजर राहिले होते.
सन २०१३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासनाच्या विविध धोरणांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पदाधिकाऱ्यांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. वारंवार न्यायालयांच्या तारखांवर हजर न राहत असल्यामुळे आंदोलकांविरुद्ध वॉरंट काढण्यात आले होते. यातील माजी खासदार ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, रज्जाक मलीक, वाल्मीक विक्रम पाटील, मीर नाजीम अली, मंगला भरत पाटील, परेश दिलीप कोल्हे, विशाल गुलाबराव देवकर हे मंगळवारी (दि. १४) न्यायालयात हजर झाले. त्यांना न्यायालयाकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यातीलच भगत बालाणी, नीलेश सुधाकर पाटील, मनोज दयाराम चौधरी, सलीम इनामदार, गणेश बुधा सोनवणे, इब्राहिम मुसा पटेल, आमदार डॉ. सतीश पाटील, अयाज अली नियाज अली यांच्यावरील खटल्यात दि. २१ व ३० मे रोजी कामकाज होणार आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. निखील कुळकर्णी यांनी तर संशयितांतर्फे अॅड. कुणाल पाटील, अजीम शेख व इम्रान हुसेन यांनी काम पाहिले.