पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती.
भारत भालके यांना ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वेळीच उपचार घेत त्यांनी करोनावर मातही केली होती. मात्र, काहीच दिवसांत त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.