राष्ट्रमंदिर संपूर्ण देशवासीयांच्या अस्मितेचे प्रतीक ; ‘टॉक शो’मध्ये सहभागी मान्यवर वक्त्यांचा सूर

0

जळगाव : प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवनप्रवास हा समर्पण, संघटन आणि समरसतेचा अंगीकार करणारा होता. त्यांनी कधीही या त्रिसूत्रीशी जीवनात तडजोड केली नाही. म्हणूनच ते अखंड मानवजातीसमोर आदर्शवत ठरले. त्यांचे मंदिर अर्थात राष्ट्रमंदिर व्हावे, ही कुणा धर्माची, समाजाची अथवा राजकीय पक्षाची अपेक्षा नसून, श्रीराम हे संपूर्ण देशवासीयांसाठी आदर्शवत असल्याने त्यांचे मंदिर हे राष्ट्रमंदिर म्हणून अस्मितेचे प्रतीक आहे, असा सूर मान्यवर वक्त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या आस्थेचे प्रतीक असलेले श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्रमंदिर या संकल्पनेवर आधारीत ‘टॉक शो’मध्ये व्यक्त केला.

शहरातील जळगाव जिल्हा श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानांतर्गत छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात झालेल्या ‘राष्ट्रमंदिर टॉक शो’मध्ये ते बोलत होते. स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊंचे सामूहिक स्मरण केल्यानंतर ‘टॉक शो’चा प्रारंभ झाला.

सुरवातीला डॉ. प्रसन्न पाटील यांनी प्रभू श्रीराम आणि सामाजिक समरसता या विषयाची मांडणी अत्यंत चपखलपणे उदाहरणांद्वारे केली. ते म्हणाले, की राष्ट्रमंदिर हे केवळ मंदिर नसून खर्‍या रामराज्यासाठीचा तो आदर्श आहे म्हणूनच संपूर्ण देश त्यासाठी एकवटलेला दिसत आहे. प्रभू श्रीरामांनी जगत्कल्याणाचा ध्यास घेऊन वनवास भोगताना आदर्शवत भूमिका वठविली. राममनोहर लोहिया यांच्यामते श्रीरामांनी उत्तरेपासून दक्षिणेच्या शेवटच्या टोकापर्यंत आपला आदर्श निर्माण केला. यात त्यांनी सर्व उपेक्षितांना जवळ केले. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवकांकडूनही हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रभू श्रीरामांच्या राष्ट्रमंदिर निर्माण कार्यात सहभाग दिसून येत आहे. अयोध्येतील राममंदिर कोट्यवधी देशवासीयांच्या अस्मितेचा विषय बनला आहे. 2005 मध्ये सामाजिक समरसता मंचातर्फे यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा प्रारंभ नाशिकच्या काळाराम मंदिरापासून झाली. यावेळी तेथेही तथाकथित उपेक्षित समाजाचे कार्यकर्तेे उपस्थित होते, हाच आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवायला हवा. स्व.अटलजींनाही वाटायचे, की श्रीरामांचे मंदिर असे निर्माण होईल की त्याच्यासमोर एकही भिकारी बसलेला दिसणार नाही.

श्रीराम मंदिर उभारणीत महिलांची समरसता कशी असावी, याबाबत अनघा कुलकर्णी म्हणाल्या, की मातृत्वाचे दान अतिशय महत्त्वाचे असते. आज राजमाता जिजाऊंची जयंती. जिजा म्हणजे परमेश्वरशक्तीने जीव जागृत करणारी. जिजाऊ अन् शिवाजी महाराज यांच्यातील नाते आदर्शवत मातृत्वतेचे उत्तम उदाहरण आहे. स्त्रीचा सहभाग नुसत्याच पतीला दशम्या बांधण्यापुरता नाही, तर ती दशम्या बांधण्यास विसरत नाही, हे तिच्यातील मातृत्व आहे. स्त्री ही पुरुषाप्रमाणेच जीवनातील संघर्ष करायला शिकवते. रामायणात सीतेनेही रामासमवेत संघर्ष केला, हे आदर्शत्वाचे उदाहरण आहे. स्त्रीने आर्यावर्तात सर्वच जण बंधू मानले. स्त्री जरी रामराज्यासाठी रस्त्यावर येत नसली, तरी पाच पिढ्यांपासूनचा अयोध्येतील मंदिराचा हा लढा नेमका काय आहे, हे समजून घेण्याकरिता कारसेवेवेळी अयोध्येत दहा दिवस आधी कारसेवक पोहोचण्यापूर्वी तेथे दाखल झाली होती. संपूर्ण देशात रामराज्य यावे, ही रामायणापासून चालत आलेली परंपरा आहे, ती आपणही कायम ठेवायलाच हवी. राम ही व्यक्ती नसून राम हे राष्ट्राचे प्रतीक आहे. त्यामुळे राम आणि राष्ट्र यातील महत्त्व समजून घेणे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे.

राष्ट्रमंदिर हे केवळ हिंदू, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवकांचेच आहे का, याचा उलगडा करताना भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी म्हणाले, की हा प्रश्न 1990 पासून खर्‍या अर्थाने निर्माण झाला आहे. रामजन्मभूमी मुक्तीचा लढा सन 1528 पासूनचा आहे. तेव्हाही राममंदिर पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र संबंधितांना यश आले नाही. 1660 मध्ये औरंगजेबाने राममंदिर पाडण्याचा प्रयत्न केला तो अयोध्येतील तत्कालीन चिमटाधारी साधूंनी हाणून पाडला. 1855 मध्येही राममंदिरासंदर्भात संघर्ष झाला. जिहादी जत्थ्याचा यात सहभाग होता. यावेळी काही भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता. 1940 मध्येही राममंदिरासंदर्भात प्रश्न निर्माण झाला. यावेळी काँग्रेसचे पंडित मदनमोहन मालवीय हे अखिल भारतीय रामायण महासभेचे संस्थापक होते. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथांचे मंदिर जीर्णोद्धाराचा आग्रह धरला अन् तो केला. त्याचवेळी अयोध्येतील राममंदिराचाही जीर्णोद्धार करण्याचे साकडे अखिल भारतीय महासभेने घातले होते. बाबा राघवदास (मराठवाडा) हे त्यावेळच्या समितीचे संयोजक होते. 1983 मध्ये रामजन्मभूमी मुक्तीचा ठराव झाला तेव्हाही काँग्रेसचेच लोक होते आणि त्यावेळच्या संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित गुलजारीलाल नंदा यांनी यासाठी पाठिंबा दिला होता. 1990 पासून खर्‍या अर्थाने पत्रकार, कम्युनिस्ट व काही धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या संघटनांनी राममंदिराच्या मुद्द्याला  राजकीय रंग देणे सुरू केले. भाजपने कारसेवेवेळी रामसेवक म्हणून भूमिका बजावली. रामजन्मभूमीने कधीही पराभव स्वीकारला नाही. त्यामुळे 492 वर्षांनंतर उभारल्या जाणार्‍या राष्ट्रमंदिरासाठीही आपण पराभव स्वीकारणार नाही.

राममंदिराविषयीची आस्था नेमकी काय आहे व ती साधू-संंतांच्या मते कशी, याबाबत श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज म्हणाले, की रामाचे चरित्र सर्वसमावेशक असल्याने ते राष्ट्रासाठीही तितकेच समर्पक आहे. भगवान दत्तात्रेयांनी 14 गुरू करून त्यांच्यातील गुण स्वतःमध्ये आत्मसात केले अन् अंगीकारले. श्रीकृष्ण हे विचारणीय चरित्र, तर राम हे अनुकरणीय चरित्र आहे. साधू-संतांची भूमिका रामांवरील श्रद्धेमुळे आजही कायम आहे. आजही साधू-संतच देशाची संस्कृती लयास जाण्यापासून वाचवत आहेत. संतांची भूमिका स्वार्थाची नव्हे, तर त्यागाची आहे. महात्मा गांधींनीही रामाला आदर्शवतच मानले. रामाला समोर ठेवून राष्ट्रमंदिराची उभारणी करणे म्हणजे आपण स्वतःच्या चरित्राचे निर्माण करणे आहे. राष्ट्रमंदिर उभारणीतून पुढील पिढीसमोर एक आदर्श निर्माण होणार असल्याने ते होणे आवश्यक आहे.

 

अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व समर्पक सूत्रसंचालन केले. याप्रसंगी श्रीराम मंदिर निधी संकलन समितीतर्फे निधी संकलनाच्या कार्यास हातभार लावण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया या शांतीमंत्राने ‘राष्ट्रमंदिर टॉक शो’चा समारोप करण्यात आला.

 

मोटारसायकल रॅलीतून श्रीरामाचा जयघोष

दरम्यान, स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवा दिनानिमित्त सकाळी कोर्ट चौकानजीकच्या शिवतीर्थापासून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येऊन आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयानजीक तिचा समारोप झाला. याप्रसंगी रॅली मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच रॅलीतील मोटारसायकलस्वार भगवे फेटे घालून हातात भगवे ध्वज घेऊन श्रीरामांसंदर्भातील गीते तसेच जयघोष करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here