रावेररात दोन गटात दंगल ; तिघे जखमी, दोन दिवस संचारबंदी

0

रावेर : कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या कर्फ्यूला देशात चांगला प्रतिसादही मिळाला. दरम्यान, देशात जनता कर्फ्यू पाळला जात असताना रावेर शहरात दोन गटात दंगल उसळल्याची घटना घडलीय. रावेरातील मन्यारवाडा मशिदीजवळ दोन गटात दंगल झाल्याची घटना रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. दंगल होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अंधारात पोलिसांना घटनास्थळ गाठण्यात विलंब झाला. पोलिसांनी तीन फैरी झाडल्यानंतर दंगल आटोक्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर रावेर शहरात दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्याबाबतची नोटीस बजावण्यासाठी पोलिस गेले होते. त्याचा राग आल्याने एका गटातील काही नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यावरून दोन गटात दंगल उसळली, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

रसलपूर येथील युवक जखमी झाल्याने त्या गावातही तणावाचे वातावरण होते. दंगलीची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अधिकारी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. दंगलीत रसलपूर येथील जावेद सलीम (वय २५) व रावेरच्या बारी वाड्यातील डिगंबर अस्वार (वय ५५), नीलेश भागवत जगताप (वय २६, रा.रावेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोतवाल वाडा, संभाजी चौक, मन्यार वाडा, बारी वाडा या परिसरात दोन्ही गटांनी जाळपोळ, तोडफोड केली. जाळपोळ झाल्याने आग विझवण्यासाठी सावदा, फैजपूर अाणि यावल पालिकेच्या बंबांना पाचारण केले. दरम्यान, या घटनेनंतर दोन दिवसांसाठी शहरात संचारबंदी लावण्यात आली. दरम्यान, अामदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.