जळगाव,दि- १६ येथील जी.एच.रायसोनी पॉलीटेक्निक महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०१८ या संशोधन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत राज्यभरातून २१३ महाविद्यालयातील संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यात या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधनाचे प्रतिमान सादर करून द्वितीय स्थानावर यश मिळविले. “सेच्युरेबल कोर रिएक्टर सॉफ्ट स्टार्टर थ्री फेझ इंडक्शन मोटार” हा प्रोजेक्ट त्यांनी सादर केला होता. अमन चौधरी, महेंद्र मोहने व उमेश बर्हाटे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयात तृतीय वर्ष डिप्लोमाचे ते शिक्षण घेत आहेत.
डिपेक्स नावाने सुरु असलेली ही राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा १९८६ साली सुरु झाली. तेव्हा पासून संशोधन क्षेत्रात विशेष शोध घेतलेल्या संशोधकांना या स्पर्धेत आपले सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध होते. यावर्षी ही स्पर्धा वालचंद महाविद्यालय सांगली याठिकाणी पार पडली. स्पर्धेत डिप्लोमा ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थी सहभाग नोंदविला होता. प्रोजेक्टसाठी प्रा.रुचा बेलसरे यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे प्राचार्य तुषार पाटील, विभागप्रमुख प्रा.पंकज पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.