रायगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अतिमुसळधार पावसामुळे  महाराष्ट्रात एकूण 6 ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 35 घरं ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. त्यातून आतापर्यंत 38 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. तर रायगडमधील पोलादपूर तालुक्यात भूस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनांची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तसेच  महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं आहे.

‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. जखमी व्यक्त लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

 

तळीये गाव उद्ध्वस्त, 38 मृतदेह मिळाले

महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलादपूर तालुक्यात भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरं गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.