रायगड प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्री आदिती सुनील तटकरे या विशेष लक्ष देत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अद्ययावत नव्या 15 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या राज्य प्रकल्प राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान निधीतून 2.25 कोटींचा निधी रायगड जिल्हा परिषदेला मिळणार आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत पालकमंत्री तटकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार संचालक, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांच्यामार्फत 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक सुविधांच्या बळकटीकरणासाठी “विशेष बाब” म्हणून हा निधी रायगड जिल्हा परिषदेस देण्यात आला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका अपुऱ्या पडू नयेत व भविष्यातही या रुग्णवाहिकांचा उपयोग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना व्हावा, या उद्देशाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या बाबीचा शासन स्तरावर नियमित पाठपुरावा केला. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सोयीसुविधांच्या दृष्टीने हे मोठे यश आहे.