नवी दिल्ली :-राफेल कराराप्रकरणी मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या निकालासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. 14 डिसेंबर रोजी ‘राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही’, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका ही फेटाळण्यात आल्या होत्या.
५८ हजार कोटींना ३६ राफेल लढाऊ विमाने फ्रान्सकडून खरेदी करण्याच्या या खरेदीवर संशय घेणारी पहिली याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एस के कौल, न्या. के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने 14 डिसेंबर 2018 रोजी या याचिकांवर निर्णय दिला होता. 36 राफेल विमानांच्या खरेदी कराराच्या संवेदनशील मुद्द्यात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यासारखे कुठलेही कारण नसून या करारात कुठलीही अनियमितता व गैरप्रकार दिसून आलेला नाही. भारतीय हवाई दलास प्रगत अशा लढाऊ विमानांची गरज आहे, असे कोर्टाने म्हटले होते.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि अन्य दोघांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
गुरुवारी प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पुनर्विचार याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लवकरच पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. आता पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.