रानडुकराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी
सार्वे – पिंप्री शेत शिवारातील घटना
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील सार्वे – पिंप्री शेत शिवारात रानडुक्कराच्या हल्ल्यात एक २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. रात्रीच्या वेळी विज पुरवठा होत असल्याने जीव मुठीत धरुन शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पाणी सोडण्यासाठी जावे लागत आहे. सरसकट दिवसाच विज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन जोर धरू लागली आहे.
शुभम कैलास राजपुत (वय – २३) रा. सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा यांची सार्वे – पिंप्री शेत शिवारात शेत जमिन आहे. शुभम राजपुत यांनी त्यांच्या शेतात मका लावलेला असुन १४ मार्च रोजी रात्री विज पुरवठा सुरू होत असल्याने शुभम राजपुत हे रात्री ९:३० वाजता पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान शुभम राजपुत यांना मागुन रानडुक्कराने जोरदार धडक दिली या धडकेत शुभम राजपुत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन शुभम राजपुत यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुभम राजपुत यांचे डाव्या बाजूला छातीजवळील हाड फ्रॅक्चर झाले असुन उजव्या हाताला देखील गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी सोडण्यासाठी जावे लागत असल्याने त्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. शेत शिवारातील विज पुरवठा हा दिवसाच सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन जोर धरू लागली आहे.