नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगसाठीचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे. सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत निर्देश देण्यात आले असून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गावर याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
या आधी पश्चिम विभागाच्या रेल्वेने 16 मार्चपासून रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेत चार्जिंग पोर्टसाठीची वीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, रेल्वे बोर्डने अशा प्रकारचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. पश्चिम विभागाने याची अंमलबजावणी 16 मार्चपासून सुरू केली आहे.
रेल्वेमध्ये लागणाऱ्या आगी थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डने काही महत्वाचे निर्णय या आधीच घेतले आहेत. दक्षिण विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी गुगनेसन यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, रेल्वे बोर्डने घेतलेला हा निर्णय काही नवीन नाही. या आधीच घेतलेल्या निर्णयाची फक्त आता अंमलबजावणी करण्यात येत आहे.
2014 साली बंगळुरु-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये आगीची घटना घडली होती. त्यावेळी रेल्वे बोर्डच्या सुरक्षा आयुक्तांनी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेतील मोबाईल चार्जिंग पोर्ट बंद ठेवावे अशी शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी आता होत असून रेल्वे बोर्डने आता सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत.

