राज ठाकरेंच्या २ वाहन चालकांना कोरोनाची लागण

0

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत.

राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. दरम्यान, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माहीम आणि दादर परिसरात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सोमवारी दादरमध्ये १६ तर माहीममध्ये कोरोनाचे २१ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे या परिसरात पालिकेकडून अजूनही खबरदारी घेतली जात आहे.

शिवसेना भवनातही कोरोनाची घुसखोरी
शिवसेना भवनात नेहमी ये-जा असणाऱ्या खासदार अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळत आहे. सोमवारी या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर संपूर्ण सेनाभवन सॅनिटाईझ करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवन जवळपास आठवडाभर बंद राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.