पुणे : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने स्थगित केला आहे. दिवाळीला २५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी कोषागारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
मनुष्यबळाअभावी वेतन आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देता येणार नसल्याबाबतचे परिपत्रक लेखा व कोषागार विभागाचे संचालक ज. र. मेनन यांनी काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.