मुंबई : राज्य सरकारने राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करत पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या नऊ, पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या १० आणि अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या नऊ अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश बुधवारी काढण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आलेले देवेन भारती यांना पदोन्नती देत, त्यांच्या खांद्यावर राज्य दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर मुंबई पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली झाली आहे. राज्य सरकारने पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या नऊ, पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या १० आणि अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या नऊ अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी केल्या.
सध्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजीव सिंघल यांची बदली मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) म्हणून करण्यात आली आहे. त्यांची जागा आता अतुलचंद्र कुलकर्णी घेतील. या प्रमुख नियुक्त्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, दीपक पांडे, प्रताप दिघावकर, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आदींची बदली करण्यात आली आहे.