माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या पाठपुराव्याला यश
भुसावळ – महाराष्ट्र राज्य हौसी राज्य नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जात असले तरी या स्पर्धेत सहभागी संघाच्या कलावंतांना गेल्या दोन वर्षांपासून मानधन मिळण्यास दिरंगाई होत होती. या संदर्भात भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांना कलावंत विरेंद्र पाटील यांनी माहिती कळवली होती व यानंतर नेमाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा केला होता व या पत्राची दखल घेत जयंत पाटील यांनी 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देत दखल घेण्याची विनंती केली होती. नेमाडेंच्या पाठपुराव्यानंतर संबंधितानी दखल घेत दिवाळीच्या काळात कलावंतांना मानधन अदा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पाठपुराव्याला आले यश – विरेंद्र पाटील
दरवर्षी मार्च महिन्यात राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेले संघांना शासनाकडून नियमित मानधन दिले जात होते मात्र मार्च महिन्यापासून कोरोना आल्यानंतर मानधन रखडले होते. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लागला असून त्यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधी व विभागाचे आम्ही आभारी असल्याचे कलावंत विरेंद्र पाटील म्हणाले.