मुंबई: महाराष्ट्रात करोना रुग्णांचा आकडा वाढत असून काल ४३१ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळं रुग्णांची संख्या आता ५ हजार ६४९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज १८ जण दगावले आहेत. मात्र, रुग्ण दुपटीनं वाढण्याचा वेग मंदावला असल्यानं घाबरून जाण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यभरात आज ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दिवसभरात राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १० मुंबईत, २ पुण्यात, २ औरंगाबादमध्ये, १ कल्याण डोंबिवलीत, १ सोलापूरमध्ये, १ जळगावात तर एकाचा मृत्यू मालेगावात झाला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना मृत्यूची एकूण संख्या २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष, तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत. तर १२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.