मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पोलीस दलातील साडे १२ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबतची माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”.
या पूर्वी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस दलात दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गृहविभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला होता. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवल्या होत्या. आज झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीत आणखी अडीच हजार जागांची भर घालून साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.