मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पर्याय राज्य सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. अशातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा रेल्वेगाड्या बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत रेल्वेने अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केली आहे.
रेल्वे बंद होणार नाही
रेल्वे मंत्रालयाने निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, रेल्वे सेवा थांबविण्याचा किंवा गाड्यांची संख्या कमी करण्याचा कोणताही प्लॅन नाही. ज्यांना ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे ते करू शकतात. त्यांना ट्रेन मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. स्थलांतरित मजुरांच्या स्थलांतरामुळे ट्रेनमध्ये गर्दी झाल्यास आम्ही त्वरित गाड्यांची संख्या वाढवू. उन्हाळ्यातील गर्दी पाहता आम्ही आधीच काही गाड्या सुरू केल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
रेल्वे स्थानकांवरील गर्दीची अफवा
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले की, पहिल्या लॉकडाऊन दरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये रेल्वे स्थानकांवर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. ते म्हणाले की, हे व्हिडिओ पाहून लोक घाबरून आहेत. हे व्हिडिओ आजचे नाहीत. सध्या रेल्वे स्थानकांवर नाममात्र गर्दी आहे.