मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल 9 महिन्यांनी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजच्या मंगल दिनी प्रत्येक मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आज भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
-नाशिकः सप्तशृंगगड येथेही भगवतीचे विधिवत पूजन करून मंदिर भाविकांसाठी खुले
अक्कलकोट इथलं स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. जवळपास 8 महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं.
आज (दि.१६) सकाळी सहा वाजल्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, तमाम भाविकांना माऊलींच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग
विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्णय मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.
शिर्डीतील साई मंदिरात 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय
शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे, त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
नागपूरः विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी एक असणारे आराध्यदैवत देवी महाकालीचे मंदिर भाविकांसाठी खुले; तूर्त केवळ मुखदर्शनच घेता येणार
जेजुरीगड भाविकांसाठी देव दर्शनासाठी खुले करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीतच भाविकांना देव दर्शन घ्यावे लागणार असल्याचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले. पहाटे साडे पाच वाजता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक कुलदैवत खंडोबाची महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
आज सकाळी महालक्ष्मी मंदिरात भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले असल्याचे चित्र दिसून आले. करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरे शासन निर्णयानुसार आज सकाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी देवदर्शनाची ओढ लागल्याने सकाळपासूनच भाविकांची पावले मंदिराकडे वळली.