मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यासह राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
औरंगाबाद शहरात आज अनेक ठिकाणी ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवला. काही भागात काही काळ ढगांचे सावट जाणवले. दुपारी पाच वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातही पावसाला सुरुवात झाली. आजच्या पावसाच्या सुरुवातीसह पुढील तीन दिवस काही भागात तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1439528568225026050?s=20
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 22 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसण्याचे संकेत अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणं किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका, असं आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.
कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
20 सप्टेंबर– पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)
21 सप्टेंबर– पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)
22 सप्टेंबर– पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)