पुणे : राज्यात येत्या पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. १ व २ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.२ जुलैला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल़ ३ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर४ जुलैला कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसांत मुंबई, कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर, तसेच खान्देश आणि मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे आता पेरण्यांच्या कामाला वेग येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळच्या टप्प्यात गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडीसह काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळी आठपर्यंत आठ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून, १० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भोगावती नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
