मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या ४-५ दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1436316325555494912?s=19
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
12 सप्टेंबरला पावसाची स्थिती
हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अलर्ट दिला आहे.
13 सप्टेंबरला पावसाची स्थिती
हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अलर्ट दिला आहे.
14 सप्टेंबरला पावसाची स्थिती
हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट दिला आहे.