राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम

0

पुणे :-  नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) सोमवारी मालदीव, कोमोरीनसह दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. मान्सूनच्या पुढील प्रगतीस हवामान अनुकूल असून, सहा जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.  सध्या राज्यात उन्हाचा चटका असतानाच ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम असून विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्य सध्या उन्हाने होरपळून निघत आहे. बहुतांश भागातील जलसाठे कोरडे पडले आहेत. अशा स्थितीत मोसमी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पोषक स्थितीमुळे नियोजित वेळेपेक्षा काही दिवस आधीच म्हणजे १८ मे रोजी मोसमी वारे अंदमानात दाखल झाले. त्यानंतर त्यांची अरबी समुद्रात प्रगती सुरू आहे. मोसमी वाऱ्यांनी ३० मे रोजी अंदमान बेटांचा संपूर्ण परिसर व्यापला. त्यानंतर ते अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागात दाखल झाले. सोमवारी (३ जून) अरबी समुद्राचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागरापर्यंत मोसमी वाऱ्यांची प्रगती केली. ६ जूनपर्यंत मोसमी वारे केरळात दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथील तापमानही ४५ ते ४६ अंशांवर आहे. मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी ४२ ते ४४ अंशांदरम्यान तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, मालेगाव, सोलापूर आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर आहे. कोकण विभागात मुंबई, सांताक्रुझ, अलिबाग, रत्नागिरीतील तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.