मुंबई :- राज्यातील २७ पॉलिटेक्निक कॉलेजांनी आपले कॉलेज बंद करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. दहावीनंतर पॉलिटेक्निक पदविका घेऊन विद्यार्थी बाहेर पडत होते. मात्र आता या अभ्यासक्रमांना दहावीचा निकाल उत्कृष्ट लागत असताना उतरती कळा लागली आहे. इंजिनीअरिंगप्रमाणे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्यास सुरुवात झाली आहे. २०१८ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पॉलिटेक्निकच्या सुमारे ७१ हजार ९०० जागा रिक्त राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, २७ कॉलेजांनी आपले कॉलेज बंद करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील तब्बल पाच हजार जागा कमी होणार आहेत.
गेल्यावर्षी तब्बल ७२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यापूर्वी, म्हणजे २०१७मध्ये पॉलिटेक्निकच्या तब्बल ८० हजार ८३५ जागा (५६.६४ टक्के) रिक्त राहिल्या होत्या. यानंतर २०१८ची प्रवेश प्रक्रिया करताना जागा रिक्त राहणाऱ्या संस्थांमधील १९ हजार जागा कमी करण्यात आल्या होत्या. यानंतरही पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यामुळे टक्केवारीनुसार २०१८मध्ये जास्त जागा रिक्त आहेत. २०१८मध्ये राज्यभरातील १ लाख २३ हजार ५०९ जागांपैकी केवळ ५१ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शासकीय तसेच, अनुदानित कॉलेजांमधील सुमारे पाच हजारांहून अधिक जागा ओस पडल्या होत्या. विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार फी भरावी लागत असूनही या जागा भरलेल्या नाहीत. शासकीय कॉलेजांतील ४ हजार ७७२, तर शासकीय अनुदानित कॉलेजांतील ४१० जागा रिक्त राहिल्या होत्या.