मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील कोरोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय सोशल मिडियाद्वारे जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.