मुंबई : राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी सादर करावीत असं सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्या सूचनांच्या आधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
मुंबईतील जिम चालकांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जिम सुरु करतांना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.