मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात पुकारलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आज संपत आहे. मात्र, गेल्या २१ दिवसांत करोनाचा संसर्ग म्हणावा तसा आटोक्यात आलेला नाही. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील काल दिवसभरात तब्बल ३५२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. एका दिवसातील हा उच्चांकी आकडा होता. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात २३३४ कोरोनाबाधित आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये असून त्याखालोखाल पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.
काल दिवसभरात राज्यात एकुण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. झालेल्या मृत्यूपैकी ९ जण मुंबई येथील असून पिंपरी चिंचवड आणि मिरा भाईंदर येथे प्रत्तेकी एका मृत्यूची नोंद आहे. राज्यात आत्तापर्यंत १६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. तिथेही प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेतली आहे.