मुंबई : राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वे व्यवस्थापनाने महाराष्ट्रातील नागरिकांना खुशखबर देत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतुकीला प्रारंभ करण्यास परवानगी दिली आहे. तसेच या संदर्भात राज्य सरकारला सूचीत केले आहे. आज २ सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. तशी घोषणाच मध्य रेल्वेने काल मंगळवारी केली आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक मध्य रेल्वेच्या सीएसएमटी कार्यालयाकडून जारी करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉक-४ च्या नियमावलीतून राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केली. सरकारने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्याने रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक आम्ही सुरू करत आहोत, अशी माहिती रेल्वेने आज एका पत्राद्वारे राज्य सरकारला दिली आहे. रेल्वेने आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासासाठी तिकीट बुकींग करता येईल, असे या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डी. वाय. नाईक यांनी याबाबतचे पत्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवले आहे. या निर्णयाने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रवासी वाहतुकीचे नियम काय असतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, गेले काही दिवस, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारने ई-पास बंदी बाबत निर्णय घेतला नसल्याने भाजपा व मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली जात होत. आता मात्र, राज्य सरकारतर्फे नागरिकांना खुशखबर देण्यात आली असून अनलॉक ४ अंतर्गत ई-पास पूर्णतः बंद करण्यात आला आहे. दिनांक १ सप्टेंबरपासून राज्यात मालवाहतूक वा खाजगी वाहनाने प्रवास करण्यासाठी आता ई-पासचे बंधन हटवण्यात आले आहे.
लोकल ट्रेन लवकर चालू करा