चाळीसगाव (प्रतिनिधी) गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक आहे. चाळीसगाव तालुक्यात गोर बंजारा समाजाचे मोठया प्रमाणात तांडे असून विविध सण – उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी आपली गोर बंजारा संस्कृती जपली आहे. गोर बंजारा समाजाची संस्कृतीची ओळख भावी पिढीला व्हावी, ही संस्कृती टिकून राहावी यासाठी सालाबादप्रमाणे तालुक्यातील अनेक बंजारा तांड्यावर दि.८ एप्रिल रोजी जागतिक गोर बंजारा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राजदेहरे तांडा येथे देखील कोरोना नियमांचे पालन करत आयोजित कार्यक्रमात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सौभाग्यवती व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनी सहभागी होत गोर बंजारा बंधू – भगिनींना जागतिक गोर बंजारा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांच्या आग्रहाखातर बंजारा महिलांची पारंपरिक वेशभूषा धारण करत गोरबोलीच्या गाण्यांवर व पारंपारिक नगारा – डफडा आदी वाद्यांच्या तालावर नृत्य देखील केले.
तालुक्याचे प्रथम नागरिक असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी स्वतः आपल्या गोर बंजारा समाजाच्या संस्कृतीप्रति आदर व्यक्त करत आनंदात सहभागी झाल्याने राजदेहरे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या नामोताई राठोड, करगाव विकासो चेअरमन दिनकर राठोड, ग्रामपंचायत सदस्य ममराज राठोड, स्वस्त धान्य दुकानदार तुळशीराम चव्हाण, जयराम राठोड, गब्रु राठोड, अंकुश राठोड, अर्जुन राठोड, रामदास राठोड ( नायक), भाटू राठोड आदी उपस्थित होते.