जळगाव । “मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. “मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी विचारण्यात आलं होतं. तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी तुम्ही मला देऊही शकणार नाही. कारण मी आतापर्यंत इतकं काही घेतलं आहे. जवळपास 15 ते 16 मंत्रिपदाचे खाते, विरोधी पक्षनेताही राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात काहीही अपेक्षा उरलेल्या नाहीत,” असे एकनाथ खडसे म्हणाले. “पण मला काही उरलेली विकासकामे पूर्ण करायचे आहेत,” असेही खडसेंनी सांगितले.
“मी पक्ष सोडत असताना मला दिल्लीवरुन फोन आला होता. त्यावेळी त्यांनी तुम्ही पक्ष का सोडता अशी विचारणा केली होती,” असा खुलासाही यावेळी खडसेंनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना राष्ट्रवादी प्रवेशानंतर खूप काही दिलं आहे, अशी टीका केली होती. यावर खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट करतानाच ‘ईडी’ने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.