चांगभलं…
धों.ज.गुरव
आपली लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय. रस्ते अपुरे पडताहेत. महामार्ग, राज्यमहामार्ग, राष्ट्रीय महामार्ग यावरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज अपघातांमध्ये अनेकांचा हकनाक बळी जातोय. कारने दुचाकीस्वारास उडविले, दोघे दुचाकी स्वार जागीच ठार, मोटारसायकलींची समोरासमोर धडक बसल्याने अपघातात चौघे ठार, ट्रकने कारला चिरडले, दोन ट्रकचा भिषण अपघात, बस अपघातात अनेक प्रवासी ठार, अनेक जखमी आदी प्रकारच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. रस्त्यावरील वाढत्या वाहनसंख्येमुळे अपघात होत असले तरी दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालविणार्यामुळे त्यात मोठी भर पडली असून त्यामुळे अपघातांची संख्या आणखीन वाढली आहे. दारू पिणार्यामुळे वाहनांचे अपघात वाढल्याचे एका सर्वेक्षणातुनही दिसून आले आहे. अपघातांत किड्या मुंग्यासारखे लोक चिरडले जावू लागले म्हणून हायकोर्टाने वर्षभरापूर्वी राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत अनुक्रमे 250 आणि 500 मिटरच्या आत असलेले दारूचे दुकान आणि परमीट रूम यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाचा हा आदेश जारी होताच. दारू दुकानवाले आणि परमीट रूमवाले एकवटले. त्यांनी शासनावर दबाव आणला. शासनाने सुध्दा शक्कल लढविली आणि वेगळा मार्ग काढून कोर्टआदेशाच्या अधिन राहून दारू दुकाने आणि परमीट रूम सुरु राहण्याचा मार्ग मोकळा केला. सर्वोच्च न्यायालयात दारू दुकानवाल्यांतर्फे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होवून राज्यमहामार्गावरील 250 मिटरची मर्यादा शिथिल केली आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गावांची लोकसंख्या 5 हजारापेक्षा जास्त असेल तर तेथे दारू दुकान व परमीट रूमला परवानगी दिली गेली. त्यामुळे पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरु झाले.
जे महामार्ग महापालिकेच्या हद्दीतून जात होते. त्या मार्गावर असलेले सर्व दारू दुकाने व परमीट रूम हायकोर्टाच्या आदेशाने बंद झाली होती. जळगाव शहराचेच उदाहरण घ्यायचे झाले तर सुमारे 45 दारूच्या दुकानासह परमीट रूमचे परवाने रद्द झाल्याने ते बंद झाले होते. परंतु येथेही दारूवाल्यांचा शासनावर दबाव आला. शासनाचा महसूल बुडतोय हे कारण पुढे करण्यात आले अन् सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असलेले हे महामार्ग महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला गेला.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतांना या महामार्गाची दुरुस्ती व देखभाल करण्याची महापालिकेची स्थिती नसतांना हे रस्ते महापालिकेने ताब्यात घेतले. अन् त्या रस्त्यावरील दारू दुकाने पूर्ववत सुरु झाली. महापालिकेला या दारू दुकानांपासून महसूल तर मिळायला लागला. पण रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती याबाबतीत मात्र आंनदी आनंद अशी परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावरील खड्डे कमी होण्याऐवजी वाढतच आहे. खंड्यामुळे अपघातही वाढतच आहे. जळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर संमातर रस्ते करण्याचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा महापालिकेने निधी नसल्याने आपले हात वर केले. तथापि जनआंदोलनाच्या रेट्यामुळे हे रस्ते महापालिकेने परत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठविला आणि समांतर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे केवळ दारू दुकानवाल्यांकडून मिळणार्या महसूलाच्या हव्यासापायी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून स्वतःकडे वर्ग करून घेतले परंतु दारू दुकानांमुळे तसेच परमीट रूममुळे भरवस्तीतील नागरीकांना होणारा त्रास याबाबत मात्र महापालिकेने विचार केला नाही. त्या त्या भागातील शांतता भंग पावते. सर्व सामान्य नागरीक आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात येते. याबाबतचा विचार केला गेला नाही. त्या परिसरात राहणारे नागरीक सुध्दा महापालिकेला कर देतात. याचाही विचार व्हायला हवा होता. जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका दारू दुकानाच्या शेजारी आजूबाजूला आमलेट तसेच शेंगदाण्याचे जे ठेले उभे असतात. तेथे दारूड्याचे घोळके खुल्याआमपणे दारू पित असतांना दिसतात. त्या रस्त्यावरून जाणार्या येणार्यांना दारूचा उग्र वासही येतो. नागरीक नाक बंद करून तेथून जातात. महिलातर संध्याकाळी 6.30 नंतर ते रात्री 10.30 पर्यंत या रस्त्याने येणे जाणे टाळतात. खुलेआमपणे ठेल्यावर दारू पिणार्या दारूड्यांवर कोणाचेच नियत्रंण नाही का? गस्त घालणार्या पोलिसांना हे दिसत नाही का? दारू बंदी खाते झोपलेले आहे का? किंवा त्यांच्यावर कुणाचा दबाव येतो का? जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गर्दी असलेल्या भररस्त्यावर ठेल्यावर परमिट रूमच्या थाटात दारूडे खुले आमपणे दारू पितात त्यांना ठेलेवाल्यांकडून पिण्याचे पाणी आणि ग्लासही पुरविले जातात. प्रसंगी थंडपेय सुध्दा दिले जातात. हा अनधिकृत दारू पिण्याचा आड्डाच नव्हे का? यावर कारवाई झाली नाही तर त्याभागातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. जळगावचे जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांनी रात्रीच्यावेळी गुप्तपणे एकफेर फटका मारून मारला तर त्यांच्या हे निदर्शनास येईल. ते कार्यक्षम व लोकप्रिय अधिकारी असल्याने जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.
Grow uncal you are gerat press repoter.sohail Rehmani
CONGRATULATION TO ALL WHO RELATED TO “LOKSHAHEE “PARIVAR…BEST OF LUCK FOR FUTURE