जळगाव : लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचालकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाला. संतोष भावलाल नन्नवरे (वय ३०, रा. बांभोरी) असे मृत ट्रकचालकाचे नाव असून ही घटना सोमवारी रात्री नशिराबाद गावाजवळ घडली.
संतोष हा सोमवारी मध्यरात्री १.३० वाजता नशिराबादकडून बांभोरीकडे ट्रकने येत होता. नशिराबादजवळ ट्रक थांबवून लघुशंकेसाठी तो रस्त्याच्या कडेला उभा होता. मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोबत असलेल्या मजुरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नशिराबाद पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नशिराबाद पोलिसांत अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. संतोष याचा मृतदेह रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय, नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला.