यूपी : ओलीस ठेवलेल्या २० मुलांची सुटका करून आरोपीचा खात्मा

0

फारूखाबाद (उत्तर प्रदेश) :– उत्तर प्रदेशातील फारूखाबादमध्ये एका गुन्हेगाराने ओलीस ठेवलेल्या २० मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान चकमकीत पोलिसांनी आरोपीला ठार केले आहे. सुभाष बाथम असे या गुन्हेगाराचे नाव आहे. कानपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी बाथम मारला गेल्याचं घोषित केलं. या कारवाईत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाले आहेत.

मात्र, मुलांना ओलीस ठेवण्यामागचे कारण समजू शकले नाही.  आरोपीच्या घरातून एक रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.

दोन वर्षांपूर्वी सुभाषने आपल्या एका नातेवाईकाचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो तुरुंगातही गेला. एक वर्षापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्याला एक 10 वर्षाची मुलगी आहे. गुरुवारी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावले होते. ही सर्व मुले 5 ते 7 वर्षांची आहेत. सगळी मुले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचे तिला कळाले. तिने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ‘मुलांच्या सुटकेची कारवाई तब्बल ८ तास चालली. पोलिसांनी सातत्यानं आरोपीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांच्या मदतीनं त्याला समजावून पाहिलं. मात्र, त्यानं पोलिसांचं आवाहन धुडकावून लावलं.  पोलिसांनी आवाहन केल्यानंतरदेखील सुभाषने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याने पोलिसांवर देशी बनावटीच्या पिस्तूलने गोळीबार सुरू केला. त्याशिवाय त्याने बॉम्बफेक देखील केली. या बॉम्बफेकीत घराजवळील एक भिंत ढासळली.

Leave A Reply

Your email address will not be published.