अमरावती :- ‘ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड, ती तोडण्याचा प्रयत्न केला तरी टी तुटणार नाही’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना-भाजप भांडावेत यासाठी देव पाण्यात घालून बसले होते, ही युती निवडणुकीपूरती किंवा सत्तेकरता झालेली नाही असे सांगताना भविष्यात युती अशीच टिकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना–भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
आघाडीवर टीका करतना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना-भाजपा युतीसमोर आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही. एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही, पत्नी निवडणूक लढवणार असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला. पण देश महत्वाचा आहे गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या. तो आपला रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड तर २०१९ मध्ये करायचा आहे. युती हा आपला एकच धर्म, जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचचे नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले.
मोदी सरकारच्या काळात प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, प्रधानमंत्री जनारोग्य, शेतकरी सम्मान निधी, गरिबांसाठी अनेक योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो. आपले सरकार येण्याच्या आधी इथे गरीबी हटली नव्हती. पण इथल्या गरीबांची बॅंकेत खाती तयार झाली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरीबांना घर मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.