लोकशाही न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोविडची तिसरी लाट आली आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र दिले जाते.
या प्रमाणपत्रावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. या मुद्यावरून अनेक गदारोळ झाला. मात्र आता जे नागरिक व्हॅक्सीन घेणार आता त्यांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो नसणार आहे. यामागचं कारण अधिक महत्वाचं आहे.
नेमकं काय कारण आहे ?
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामुळे आता या राज्यात आचार संहिता लागू झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आता राज्यात दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो नसणार.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर आवश्यक फिल्टर टाकणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील विधानसभा निवडणुका १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहे.
१० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सरकार, उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता कोविड व्हॅक्सीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावता येणार नाही.
या आधीही पंतप्रधान मोदी यांचा फोटो काढण्यात आला होता. मार्च 2021 मध्ये, आरोग्य मंत्रालयाने काही राजकीय पक्षांच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमधील निवडणुकांदरम्यान अशीच पावले उचलली होती.