यावल । शहर व तालुक्यात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वादळ वाऱ्यासह पाऊस दाखल झाला या वादळामुळे यावल तालुक्यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्यामार्गावर ठिक ठिकाणी झाडे पडून सुमारे एक तासभर वाहतूक ठप्प झाली होती. तर साकळी गावात घरावरील पत्रे उडून तीन जण जखमी झाले तर पिंप्री गावात पत्र्यांच्या घरावर विद्युत तारे पडून प्रवाह संचारला होता, सुदैवाने जिवीत हाणी नाही. मात्र कापणी योग्य झालेल्या केळी पिकाचं या वादळात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
रविवारी दुपारी तीन वाजेला मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. वादळ वारा इतका वेगात होता की राज्य मार्गावर असलेले वर्षानुवर्ष वाढ झालेले भलेमोठे वृक्ष थेट मुळापासून कोलमडून रस्त्यावर कोसळले तसेच कापणी योग्य झालेली केळी पीक देखील या या वेगवान वाऱ्यात जमीनदोस्त झाले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज सध्यातरी वर्तवला जात असून पंचनामे झाल्या नंतर केळी पिकाचे झालेल्या नुकसानाचा पूर्णपणे अंदाज येईल तसेच अंकलेश्वर – बऱ्हाणपूर रस्त्यावर कोसळलेल्या वृक्षांमुळे वाहतूक सुमारे एक तास कोलमडली होती तर वृक्ष कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अभियंता ए.जे. निंबाळकर यांनी तात्काळ दोन पथके रवाना करण्यात आली व रस्त्याची वाहतूक मोकळी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने रस्त्यावर कोसळलेल्या वृक्षांना रस्त्याच्या बाजुला केले. तर या वादळी पावसामुळे केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आता महसूल प्रशासनाकडून लवकरच पाहणी केली जाणार आहे. व पंचनामे केले जातील असे तहसिलदार जितेंद्र कुवर यांनी सांगीतले.
या भागात नुकसान
तालुक्यातील साकळी, चुंचाळे, मनवेल, शिरसाड, पिंप्री व डोंगरकठोरा या भागात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर साकळी गावात वादळी वाऱ्या घरावरील पत्रे उडाली त्यात मोहन गजानन बडगुजर सह गावतील अजुन दोन जण जखमी झाले आहे. वढोदे येथे देखील एका घरावर झाड कोसळले असुन त्यातही कुणी जखमी नाहीये तर यावल ग्रामिण रूग्णालयात देखील वृक्ष कोसळले.
मोठी दुर्घटना टळली
तालुक्यातील पिंप्री येथे घरावरील पत्रे उडाली तसेच विद्युत प्रवाह सुरू असलेली तारं पत्र्याच्या घरावर पडली आणी संपुर्ण घरात विद्युत प्रवाह संचारला होता विद्युत कंम्पनीने वेळीच खबरदारी घेतल्याने गावात मोठी दुर्घटना टळली.
शेेतकरी हवालदिल
सद्या केळीला चांगला भाव असून मागणी देखील चांगल्या प्रमाणात होती तर आधीच दुष्काळ सदृश्य स्थिती मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या व आता कापणी योग्य झालेले केळी या वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे तेव्हा शेतकऱ्यांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.