यावल:- चैत्र पौर्णिमा या दिवशी सालाबाद दिनांक 19 शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान …….असा जयघोष करीत हनुमान जयंती ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता श्री महर्षी व्यास मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सव कार्यक्रमास मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस चोपडा नाक्याजवळ नदीपात्रात मोठी यात्रा भरून येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषात श्री खंडेराव महाराजांच्या नावाने बारा गाड्या ओढल्या गेल्या या त्रिवेणी संगमाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण यावल शहरात मोठा जल्लोष शांततेत पार पडला.
यावल शहरात सुमारे 125 वर्षापासून चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवसाचे औचित्त साधून श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येतो, संध्याकाळी सहा वाजता शास्त्रोक्त पद्धतीने श्री बालाजी महाराजांची महापूजा करून व्यास मंदिरापासून नदीपात्रातून रथ ओढण्याचा कार्यक्रम सुरू झाला, यावल शहरातून मेन रोडने बोरावल गेट, व देशमुख वाड्यातून, वाणी गल्लीतून रथ ओढला जातो हा रथ ओढण्याचा कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतो. ठीकठिकाणी श्री पुरुषांनी श्री बालाजी महाराजांच्या रथाजवळ आरती व महाप्रसादाने स्वागत केले. सकाळी पाच वाजेच्या सुमारास श्री रेणुका देवी मंदिराजवळ रथोत्सवाची सांगता झाली.
श्री हनुमान जयंतीनिमित्त यावल शहरात अतिप्राचीन जागृत असा मोठा मारुती मंदिरात सकाळी सहा वाजता मोठा मारुतीची शास्त्रोक्त पूजा करून हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम पार पडला.
पूजेचा मान सूतगिरणीतील एक कर्मचारी बापू देशमुख याला मिळाला. याचप्रमाणे यावल शहरात मेन रोडवर चावडी जवळ तसेच पंचायत समिती आवारातील हनुमान मंदिरात व इतर ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराच्या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचा लाभ हजारो हनुमान भक्तांनी घेतला. यावेळी महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून आला संध्याकाळी सहा वाजता चोपडा नाका जवळ नदीपात्रात श्री बालाजी महाराज रथ व श्री खंडेराव महाराज यांचा संगम होत असल्याने नदीपात्रात मोठे यात्रेचे स्वरूप दिसून आले वरील तीनही कार्यक्रम शांततेत पार पाडणे कामी शहरातील सर्व जाती धर्माचा तीय सलोखा हा कौतुकास्पद ठरत असला तरी पोलिस होमगार्ड बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.