खामगाव (गणेश भेरडे) :- येथील एमआयडीसी भागातील यश एंटरप्राईजमध्ये काल 23 एप्रिल रोजी दोन कामगारांना काही कारणास्तव निलंबित केल्यावरून कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांना या दोन कामगारांना जोपर्यत कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र सायंकाळी व्यवस्थापन व कामगारांमध्ये समेट घडून आल्याने वातावरण निवळले. एकीकडे कोरोना महामारीच्या काळात सरकार कामगारांच्या तक्रार व समस्या निवारणासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे कामगारांवर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी भागातील यश एंटरप्राईज मधील कामगार प्रदीप निमकार्डे व सचिन मोरखडे या दोघांना 23 एप्रिल रोजी सकाळी कामावरून कमी केले होते त्यामुळे कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन करीत कंपनीच्या गेटवरच ठिय्या आंदोलन केले. यामुळे कंपनीमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलीस बंदोबस्त दिसून आला. कामगारांच्या म्हणण्यानुसार कामगारांची कंपनीत गळचेपी होत असून त्यांना साध्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. याविरूध्द आवाज उठविल्यास व्यवस्थापनाकडून कामावरून कमी करण्याची धमकी देण्यात येते. कँटीन मध्ये चहा, पोहे, कचोरी याशिवाय काही मिळत नाही. तर कोरोना काळात पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था नाही. याशिवाय अनेकही असुविधा असल्याचे बोलले कामगार बोलत आहेत. तर व्यवस्थापन आपलेच खरे, अशी भूमिका घेत असल्याने वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
मोदी सरकारचा कामगार कायदा कारणीभूत!
केंद्रातील मोदी सरकारने मागील वर्षी नवीन कृषी व कामगार कायदा लागू केलेला आहे. कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्यामुळे देशातील शेतकर्यांनी रान माजविले असून दिल्ली येथे तर अजुनपर्यंत आंदोलन सुरू आहे. त्याचप्रमाणे कामगारांचा कायदासुध्दा उद्योगपतींच्या हितात व कामगारांना मारक असल्याचे दिसून असल्याचे या घटनेवरून दिसून येते, असे कामगार बोलत आहेत.
दानशूर व्यक्तीला शोभेनासे कृत्य!
सदर कंपनीचे संचालक बिपीनभाई गांधी हे शहरात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाते. कोरोना महामारीच्या काळात मागील वर्षी त्यांनी येथील सामान्य रूग्णालयात जिल्ह्यातील पहिली कोव्हिड टेस्ट लॅब उभारणीसाठी लाखो रूपये खर्च केले. त्यांच्या या समाजसेवी कर्तव्यामुळे त्यांना पत्रकारांनी खामगाव रत्न पुरस्काराने नावाजले आहे. तर अजुनही कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कंपनीत असे प्रकार घडणे हे त्यांच्या कर्तृत्वाला शोभेनासे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न्ा केला असता त्यांच्या व्यवस्थापनात चहापेक्षा कॅटली गरम अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींचा भरणा असल्याने कामगार त्रस्त झाले असल्याचे बोलले जात आहे.
कामगारांची अरेरावी- बिपीनभाई गांधी
सदर घटनेबाबत कंपनीचे संचालक बिपीनभाई गांधी यांना विचारणा केली असता त्या दोन कामगारांना अर्धा तास लाईन बंद केला होता तर मॅनेजरच्या अंगावरही धावून गेले होते. त्यामुळे त्यांनी शोकॉज नोटीस दिली होती असे सांगितले.
मोदी सरकारचा कामगार
कायदा कारणीभूत!-केंद्रातील मोदी सरकारने मागील वर्षी नवीन कृषी व कामगार कायदा लागू केलेला आहे. कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्यामुळे देशातील शेतकर्यांनी रान माजविले असून दिल्ली येथे तर अजुनपर्यंत आंदोलन सुरू आहे. त्याचप्रमाणे कामगारांचा कायदासुध्दा उद्योगपतींच्या हितात व कामगारांना मारक असल्याचे दिसून असल्याचे या घटनेवरून दिसून येते, असे कामगार बोलत आहेत.
कामगारांनी फक्त काम करावे राजकारण करू नये-
सध्या कोरोना महामारीचा काळ पाहता उद्योगांसमोरही मोठे संकट ठाकले आहे. त्यामुळे कित्येक उद्योग बंद पडून बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उद्योग व रोजगार सुरळीत रहावा यासाठी व्यवस्थापनासोबतच कामगारांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्योगांमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ देऊ नये, असेही बोलले जात आहे.