नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं 1 एप्रिलपासून महागणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. यासह मासिक पासच्या किंमतीही 10 ते 20 रुपयांनी वाढू शकतात.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवते. FASTag च्या टोल टॅक्समध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांपासून ते ट्रांसपोर्टर्सपर्यंत सर्वांना याचा फटका बसणार आहे. NHAI प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवते. FASTag च्या अनिवार्यतेनंतर टोल टॅक्समध्ये वाढ केली जाणार असल्याने वाहतूकदार तसेच सामान्य नागरिकांवरही त्याचा बोजा वाढणार आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार गोरखपूरमधील तीन टोल प्लाझांवरील टोल दर 5 ते 30 रुपयांनी वाढणार आहेत. नयनसार, टेनुआ आणि शेअरपूर चामराह येथील टोल वसुलीच्या आधारे अधिकारी लवकरच टोल दर वाढविण्याचा प्रस्ताव पाठवणार आहेत. याद्वारे मासिक टोलमध्येही 10 ते 20 रुपयांची वाढ होणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरुन ये-जा करणाऱ्या लोकांचा खर्च वाढू शकतो.
NHAI गोरखपूर झोन प्रकल्प संचालक सीएम द्विवेदी म्हणाले की, “टोल टॅक्स प्रत्येक आर्थिक वर्षात वाढतो. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.”
FASTag द्वारे दरवर्षी 20,000 कोटी रुपयांची बचत होणार
FASTag इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली टोल प्लाझावरील प्रतीक्षा कालावधी (वेटिंग टाईम) कमी करते, असा दावा केला जात आहे. तसेच यामुळे इंधनाचा वापर कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, राष्ट्रीय महारामार्गांवरुन धावणाऱ्या सर्व वाहनांनी FASTag चा वापर सुरु केला तर दरवर्षी भारतात पेट्रोल आणि डिझेलवर 20,000 कोटी रुपयांची बचत होईल.
16 फेब्रुवारीपासून FASTag अनिवार्य
देशात 16 फेब्रुवारीपासून FASTag सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर टोल वसुलीत प्रचंड वाढ झाली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या म्हणण्यानुसार, फास्टॅगमुळे टोल वसुली 104 कोटींवर गेली आहे.
Fastag म्हणजे काय?
वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.