मुंबई : सोमवारी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३६ आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळातून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना वगळण्यात आले. यातच, संजय राऊत यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी न लावल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही, त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही’ असं संजय राऊत म्हणाले. त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारलं. तेव्हा, उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, असं राऊतांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही नाराजी नसल्याचं संजय राऊत म्हणाले.
चहापानावर बहिष्कार टाकणं ठीक आहे, पण शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची पद्धत चुकीची आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ‘त्यांनी अशाप्रकारे बहिष्काराचं शस्त्र वारंवार उपसू नये अन्यथा ते बोथट होईल. जनतेचा विरोधी पक्षावरील विश्वास उडून जाईल. विरोध पक्ष सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडण्यास तयार नसेल तर ही पोकळी दुसऱ्या कोणाला तरी भरुन काढावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.