जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. समीर सत्तार पिंजारी (वय २१, रा.शाहुनगर, जळगाव) व सलमान नबी पिंजारी (वय २४, रा. पहूर ता.जामनेर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील मोबाइलचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या आहेत. पहूर येथील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांबाबत एलसीबीचे पीआय किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन पोलिस हवालदार अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागूल, रमेश चौधरी, मुरलीधर बारी यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
पथकाने शनिवारी रात्री संशयित समीर पिंजारी व सलमान पिंजारी या दोघांना ते राहत असलेल्या परिसरातुन अटक केली. दोघांनी पहुर येथुन दहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल लांबवल्याची कबुली दिली आहे. दोघांकडून गुन्ह्यातील मोबाइल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी दोघांना पुढील कारवाईसाठी पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.