नवी दिल्ली : जर तुम्ही भाड्याने राहत असाल आणि तुम्हाला घरमालक अचानक भाडं वाढवण्याची चिंता सतावत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकार आता मॉडल रेंटल ऍक्टचा ड्राफ्ट तयार करत आहे. त्यात घरमालक आणि भाडेकरू यांच्यातले वाद संपून जातील. दोघांचे हक्क शाबूत राहणार आहेत.
या ड्राफ्टप्रमाणे घरमालक 2 महिन्यांपेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट घेऊ शकत नाही. भाडेकरूंसाठी करण्यात येणाऱ्या कायद्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मंत्रालयात या विधेयकाला मंजुरी मिळवण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेटच्या भाषणात सांगितले होते की, सरकार भाडेकरूंसाठी आदर्श कायदा करणार आहे. सध्याचे कायदे जुने आहेत. ते मालक आणि भाडेकरू यांचे प्रश्न सोडवायला असमर्थ आहेत. दरम्यान, या कायद्याच्या ड्राफ्टचे काम सुरू आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात यासंबंधी एक बैठक होणार आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेला ग्रूप यावर जोरात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.