नवी दिल्ली: केंद्रात सत्तेवर आलेले “एनडीए’चे सरकार आगामी काही दिवसात संरक्षण क्षेत्रातील मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तब्बल 17 हजार 500 कोटी रुपयांच्या अमेरिकेतील हेलिकॉप्टर खरेदीच्या प्रस्तावाला लवकरच केंद्र सरकारची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असून ही हेलिकॉप्टर नौदलासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते आहे. नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
भारत अमेरिकेकडून “लोकीड – मार्टिन सिल्कोर्स्की एमएच-60 आर’ या बनावटीची 60 हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. पाणबुडी विरोधी आणि विमानभेदी क्षेपणास्त्रांपासून संरक्षणाची नौदलाची क्षमता यामुळे वाढणार आहे. अमेरिका सरकारच्या विदेशी लष्करी विक्री कार्यक्रमांतर्गत या हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार आहे. या कार्यक्रमानुसार थेट दोन्ही सरकारमध्ये खरेदी विक्री व्यवहार केला जाऊ शकणार आहे.
ही नवीन हेलिकॉप्टर “सी किंग 42/42ए’ या हेलिकॉप्टरची जागा घेणार आहेत. “सी किंग 42/42ए’ ही हेलिकॉप्टर जवळपास दोन दशकांपूर्वीच सेवेतून बाद झाली आहेत.