बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसा राजकीय लढाईला रंग चढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘न वाचता १५ मिनिटं सलग भाषण’ करण्याचं आव्हान दिलं होतं. आता राहुल यांनी एक व्हिडिओ ट्विट करत पंतप्रधान मोदींना काही मुद्द्यांवर पाच मिनिटं बोलण्याचं आव्हान दिलं आहे. ‘मोदीजी, तुम्ही बोलता खूप, पण तुम्ही बोलता ते करत नाही,’ असं राहुल यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
कर्नाटक निवडणुकीत भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना तिकीट दिल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘रेड्डी भावंडांच्या गँगला भाजपनं ८ तिकिटं दिलीत, यावर मोदीजी तुम्ही ५ मिनिटं बोलणार का?,’ असा सवाल राहुल यांनी केला आहे. २३ केसेस असतानाही येडि्डयुरप्पा तुमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. यावर पंतप्रधान बोलणार का, असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला आहे.