बंगळूर – ओडिशामधील सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला केंद्रीय प्रशासकीय लवादाने (कॅट) दिलासा दिला आहे. त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाला कॅटने स्थगिती दिली आहे. मोहम्मद मोहसीन असे दिलासा मिळालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) कर्नाटक केडरचे अधिकारी आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून मोहसीन यांची ओडिशात नियुक्ती करण्यात आली. एसपीजी सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे वाहनांची तपासणी करू नये असा नियम निवडणूक आयोगाने आखून दिला आहे. मात्र मोहसीन यांनी मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. त्यामुळे मोदी यांना सुमारे १५ मिनिटांचा खोळंबा झाला. या साऱ्या प्रकाराचा अहवाल संबळपूरच्या प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला मिळाल्यानंतर मोहम्मद मोहसीन यांना निलंबित करण्यात आले होते.