व्यासपिठावर यूतीच्या उमेदवारांना स्थान : बंडखोरांना नो एन्ट्री ?
जळगाव –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या दि.13 रोजी जळगावात होणार्या जाहीर सभेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच खान्देशात येत असल्याने तिनही जिल्ह्यात यूतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हयातील यूतीच्या सर्व उमेदवारांना व्यासपिठावर स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त असून भाजपातील बंडखोरांना मात्र, नो एन्ट्री असल्याचे रात्री उशिरापर्यंतचे वृत्त आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यूतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करणार असल्याने बंडखोरांसाठी ही सभा निर्वाणीचा इशारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिलीच जाहीर सभा असल्याने ही सभा ऐतिहासीक करण्यासाठी पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे सर्वच पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. विमानतळाशेजारच्या भारत फोर्ड कंपनीच्या प्रशस्त जागेची निवड मोदींच्या सभेसाठी निवडण्यात आली आहे. जिल्ह्यातील किमान दिड लाख नागरिक, कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा ना.गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. सभास्थळी किमान एक लाख लोकांसाठी वॉटर प्रुफ डोम उभारण्यात आला आहे. सभास्थळी येणार्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. डोममध्ये एक लाख लोकांची व्यवस्था असली तरी डोमच्या बाहेरही 50 हजारापेक्षा जास्त जणांची बैठक व्यवस्था केली जाणार असल्याचे ना.महाजन यांनी सांगितले. वाहनांनी बाहेर गावाहून येणार्यांना जास्त पायपीट नको म्हणून सभास्थळपासून काही अंतरावरच वाहन तळाची निर्माती करण्यात आली आहे. ही सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास ना.महाजन यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त बंडखोरी भाजपात झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या चारही जागांवर भाजपाचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेने सोबत असलेल्या मतभेदामुळे स्थानिक भाजपा पदाधिकारी उघडपणे या बंडखोरांचे काम करीत आहेत. बंडखोर अपक्ष उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आपआपल्या मतदारसंघात आवाहन करीत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेत भाजपा – शिवसेना यूतीचा प्रचार करणार असून जिल्ह्यातील यूतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. याच दृष्टीकोनातून मोदींच्या व्यासपिठावर जिल्ह्यातील युतीच्या सर्व उमेदवारांना स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान मोदी यूतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करतील. असे झाले तर भाजपाच्या बंडखोर आणि त्यांना समर्थन देणार्या कार्यकर्त्यांची पंचाईत होणार असल्याचे मानले जात आहे.
मोदींच्या आवाहनानंतरही यूतीच्या विरोधात काम करणे म्हणजे त्यांच्या अवमान केल्यासारखेच होईल. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच वेगळे संकेत जाण्याची शक्यता आहे. परिणामी उद्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा खर्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. भाजपाच्या बंडखोरांना या सभेत काय स्थान मिळते यावरून त्यांची भविष्यातील वाटचाल निश्चित होणार आहे.
विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी
देशाचे प्रधानमंत्री रविवार, 13 ऑक्टोंबर, 2019 रोजी जळगांव जिल्हा दौर्यावर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची नियोजित सभेचे ठिकाण असलेल्या येथील भारत फोर्जचे ग्राऊंड परिसर व विमानतळ यांच्या सभोवताली किमान 10 किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाईट, एअरक्राफ्ट, प्रायव्हेट हेलीकॉप्टर्स, पॅरामोटर्स व हॉट एअर बलून्स व तत्सम हवाई साधने उड्डाणास व प्रवेशास बंदीचे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारत फोर्ज ग्राऊंड परिसर व जळगांव विमानतळ यांच्या सभोवताली किमान 10 किमी पर्यंत अंतरावर 12 ऑक्टोंबर, 2019 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 13 ऑक्टोंबर, 2019 रोजी दुपारी 15.00 वाजेपावेतो हे आदेश लागू करण्यात येत असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. सदर आदेशाचा भंग करणार्या विरुध्द भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.